खंडाळा तालुका
खंडाळा तालुक्याचे मुख्य ठिकाण हे हरी पारगांव-खंडाळा असले तरी या तालुक्यातील शिरवळ हे महत्वपूर्ण गांव आहे. शिरवळ हे गाव निरा नदीच्या काठावर वसले आहे. शिवरायांनी स्वराज्य स्थापना करण्याकरिता सुरुवातीला या भागातील किल्ले व मुलुख ताब्यात घेतले. नीरा नदीच्या दक्षिण काठावर वसलेल्या या गावात एकभुईकोट किल्ला आहे. त्याला किल्ले सुभानमंगळ असे नाव आहे. हा किल्ला फार उंच नाही अगर याचा विस्तारही मोठा नाही. या किल्ल्याभोवती मातीचा तट बांधलेला आहे. परंतु आज मात्र हा किल्ला ढासळलेल्या अवस्थेत असून सध्या तेथे पाहण्याजोगे फारच कमी आहे. उंचीने थोटका पण आकाराने नेटका. या किल्ल्याभोवती मातीच्या भेंडयांचे तट आढळतात.
नायगाव
शिरवळ पासून ५ कि.मी. उत्तरेला नायगाव आहे. हे थोर समाजसुधारक महात्मा जोतीबा यांच्या सुविध्य पत्नी, स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव. आज त्यांच्या राहत्या घराच्या जागेवर त्यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात आले आहे. येथे सावित्रीबाईंचा अर्धपुतळा उभारुन जुन्या पध्दतीचा भव्य वाडाही बांधण्यात आला आहे सावित्रीबाईची जयंती येथे साजरी केली जाते. येथे महिला अध्यापक विद्यालयही सुरु करण्यात आले आहे.
वीर धरण
नीरा नदीवर वीर या गावाजवळ ब्रिटीशांनी एक धरण बांधले असून ते वीर धरण या नावानेच प्रसिध्द आहे. या धरणाच्या जलाशयाला येसाजी कंक जलाशय असे नांव दिले आहे. शिवाजी महाराजांचा शूर सेनानी म्हणून येसाजी कंक ओळखले जातात. या धरणामुळे मोठे जमीन क्षेत्र सिचनाखाली आहे.