कराड तालुका
कोयनेला करहा असे प्राचीन काळी म्हणत. करहेच्या काठी असलेले करहाटक त्यावरुन करहाट, करहाड, कराड अशी व्युत्पती झाली. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे येथे मंदिर होते. मुसलमानी राजवटीने या देवळाचा विध्यवंस केला. हल्ली येथे त्याचा चौथरा असून मुस्लिम लोक तेथे प्रेते पुरतात. विठोबाआण्णा दप्तरदार हे संतकवी येथे होऊन गेले. कृष्णा-कोयना संगमावरील शहर, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमि, कृष्णा-कोयना प्रितीसंगमावर त्यांची ससमाधी. जवळचं जाखीणवाडी येथे ५४ बौध्दधर्मीय लेण्यांमध्ये आजवर न आढळलेले धम्मचक्र येथील गुंफा क्र. ६ मध्ये आढळले.
पाल
तारळी नदीकाठी वसलेल्या पाल येथे खंडोबाचे जागृत देवस्थान आहे. पुणे-बेंगलोर महामार्गावर काशीळच्या पश्चिमेस सुमारे ७ कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. तारळा नदीच्या काठी वसलेले गाव. हे गाव खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिध्द पावले आहे. चारी बाजुला तटबंदी असलेले हे हेमाडपंथी मंदीर आहे. मंदिराच्या आजुबाजुला पिड नाग, नदी, यांची चित्रे कोरलेली आहेत तसेच खंडोबाची दुसरी बायको बाळुबाई यांचीही मुर्ती दिसते.
कृष्णा घाट
या शहराच्या उत्तरेकडे पवित्र अशा कृष्णा-कोयनेचा संगम झाला आहे. यशवंतराव चव्हाणांची समाधी आहे. या समाधी स्थानाजवळ एक सुंदर उद्यान तयार करण्यात आले आहे. उद्यानात सर्वत्र हिरवळ, फुलझाडे, शोभेची झाडे तसेच अनेक डेरेदार वृक्ष आहेत. त्यामुळे हा परिसर रमणीय दिसतो. या उद्यानात एका बाजुला लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी, झोपाळे तसेच अनेक नवनवीन खेळ बसविण्यात आले आहेत. या उद्यानात सर्वांना मोफत प्रवेश मिळतो. या समाधीचे दर्शन घेण्यासाठी स्थानिक जनतेबरोबरच पर्यटक व राजकीय नेते मंडळींची ही वर्दळ वाढली आहे. सर्वात जुने मंदिर रत्नेश्वराचे याच घाटावर आहे. या मंदिरावर मुस्लिम शिल्पकलेप्रमाणे ४ मनोरे व हिदू कलेप्रमाणे कळस या मंदिरावर बघायला मिळतो. कृष्णामाईच्या देवीची यात्रा चैत्र वद्य १ व शेवटच्या श्रावणी सोमवारी भरते.
मनोरे
कराड मधील एक प्रेक्षणीय स्थळ मनोरे. मनोरे म्हणजे एक जुनी दगडी मशीद आहे. कराड शहरात मुस्लिम बांधवाची संख्या मोठी आहे. या मशिदीत रोज अनेक लोक नमाज पढण्यासाठी येतात. मशिदीचे बांधकाम दगडी आहे. छताजवळ बाहेरच्या चारही बाजूंना कोरीव नक्षीकाम आहे. मशिदीच्या आतमध्ये दगडी शिल्लालेखावर उर्दू भाषेत कोरलेला काही मजकूर आहे. या मशिदीच्या मागे लाकडे महाव्दार असून त्याच्या डाव्या व उजव्या अशा दोन्ही बाजूंना प्रत्येकी १०६ फूट उंचीचे दोन गोलाकार मनोरे बांधण्यात आले आहेत. मनोर्यांच्या शिखरांवर जाण्यासाठी आतून गोलाकार दगडी जीने बांधण्यात आले आहेत. मनोर्यांच्या शिखरावरुन कराडच्या भोवतालचा लांबवरचा परिसर दिसतो. विजापूरचा सुलतान अली आदिलशहा पहिला याच्या १५५७ च्या काळात इब्राहिमखान याने उभारली.
सदाशिवगड
सातारा जिल्ह्यातील २७ ऐतिहासिक व वैभवशाली किल्ल्यापैकी सदाशिवगड हा एक शिवकालीन किल्ला आहे. कराड शहरापासून पूर्वेस ७ कि. मी. अंतरावर आहे. गडावर असणार्या शिवशंभूमहादेवाच्या मंदिरामुळे या गडालासुध्दा शिवगड नाव असे पडले. हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला असून याचे क्षेत्रफळ२३ एकर एवढे आहे. शिवकालात या गडाचा उपयोग शत्रुची टेहाळणी करण्यासाठी केला जात असे. या किल्ल्याच्या माध्यावरील शिवशंभू महादेवाचे मंदिर प्रेक्षणिय आहे. हे किल्ल्या इतके प्राचीन आहे. गाभार्यात पिडी शेजारी भगवान शंकर व गणेश यांच्या मिश्रधातूंच्या मुर्ती बसवलेल्या आहेत. या मंदिरात दरवर्षी श्रावणातल्या सोमवारी मोठी गर्दी असते. शेवटच्या सोमवारी यात्रा भरते. किल्ले सदाशिवगड या गडाच्या पायथ्यास चारही बाजूला राजमाची, वनवासमाची,हजारमाची,बाबरमाची अशा चार माच्या आहेत. गडावर स्वयंभू शिवमंदीर आहे.
चांदोली अभयारण्य
चांदोली धरण सांगली जिल्ह्यात असले तरी पाण्याचा फुगवटा हा सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यात येतो. हे अभयारण्य ३०९ चौ.कि.मी. परिसरात आहे. यात अनेक वनौषधी आहेत.
सागरेश्वर
कराड तासगाव रोडवर यशवंत घाटाच्या पायथ्याला अंदाजे २२ मंदिरांचा परिसर आहे. किर्लोस्करवाडी ते देवराष्ट्रे जवळील १०८८ चौ. हेक्टर क्षेत्रात हे अभयारण्य विस्तारले आहे. यात सागरेश्वर, कुबेर, कपिलेश्वर, त्र्यंबकेश्वर, नागेश्वर, रामेश्वर यांची मंदिरे आहेत. कर्कोटक नावाच्या ऋषींची ही समाधी येथे आहे. सागरेश्वर अभयारण्यात काळविट, हरिण मोर, ससे, लांडगे हे प्राणी बघायला मिळतात. प्रामुख्ययाने हे अभयारण्य हरिणासाठी प्रसिध्द आहे.
आगाशिवनगर
आगाशिवच्या परिसराला पूर्वी गोळीबार म्हणून संबोधले जायचे आज हा परिसर मलकापूर/ कृष्णा हॉस्पिटल परिसर म्हणून परिचित आहे. या डोंगरावर असणारे शिवमंदिर प्राचीन आहे. या शिवमंदिराजवळच काळया दगडामध्ये कोरलेल्या एकूण २२ गुंफा आहेत. सहा क्रमांकाच्या गुंफेच्या बाहेर उजव्या बाजूला धम्मचक्र आहे. तर डाव्या बाजूला सिह कोरलेला आहे.
वसंत गड
कराड नजीक तळबीड या गावाला लागून वसंत गड आहे. इ. स. १६५९ मध्ये अफजलखानला मारल्यावर लगेचच शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला. नंतर २५ ऑगस्ट १६९९ रोजी औरंगजेबाने हा किल्ला धेवून त्याचे विजयाची किल्ली ओ नामकरण केले. पुढे ताराबाईनी रामचंद्र पंत प्रतिनिधींच्या पायात रुप्याच्या बेडया घालून त्यांना तेथे कैदेत ठेवले. या गडावर दरवर्षी मोठी यात्रा भरते. गडावरील मंदिराच्या उत्तरेस मोठा बुरुज असून तो जुन्या काळाची साक्ष देत उभा आहे.
भुईकोट किल्ला
प्रतिसंगमानजिक पंताच्या कोटात एक भुईकोट किल्ला आहे. मात्र त्याची दुरवस्था झाली आहे.