१.१ विभागविषयक प्राथमिक माहिती :-
शिरवळच्या सुभानमंगळापासून , प्रतापगड , राजधानी अजिंक्यतारा ते दातेगड, महिमानगडापर्यंत असंख्य गडकोट किल्ल्यांनी सह्याद्रीचा दैदीप्यमान इतिहास जगलेल्या, जपलेला ; गोंदवले, शिखर शिंगणापूरपासून सज्जनगड ते अगदी मांढरगड आणि क्षेत्र महाबळेश्वरपर्यंत विविध आस्थांना श्रद्धेने जपलेला ; कोयनेपासून कण्हेर, उरमोडी ते अगदी धोम,बलकवडीपर्यंत धरणांनी आणि कृष्णा , कोयना, उरमोडी, कण्हेर, वेण्णा अशा अनेक नद्यांनी ही भूमी सुजलाम सुफलाम करणारा ; पाचगणी महाबळेश्वरपासून , कास पठार आणि पाटण, कोयनानगरच्या सुंदर दऱ्याखोऱ्यातून अपरिमित निसर्ग सौंदर्याची उधळण करणारा ; असंख्य ऊस पिकांना न्याय देणारे अनेक साखर कारखाने सांभाळणारा ; कोयना, वेण्णा, अजिंक्य, सातारा, क्वालिटी , गोविंद अशा अनेक दूध संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यात श्वेतगंगा वाहवणारा; अभयारण्यांमध्ये , गिरी शिखरांमध्ये असंख्य वन्य प्राणी सांभाळणारा आणि हजारो पशुपालकांचे जीवनमान सुधारणारे गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, अश्व, वराह, श्वान, मार्जार असे सर्व प्रकारचे पाळीव प्राणी सांभाळणारा ‘ऐतिहासिक तरीही अत्याधुनिक’ असा आपला सातारा जिल्हा ! पशुपालन हा येथील बहुसंख्य बहुजनांचा शेती बरोबर उत्तम उत्पन्न देणारा जोडव्यवसाय ! हा जोड व्यवसायात अनेक जणांचा आता मुख्य व्यवसाय बनलेला आहे आणि त्यांच्या या उन्नतीमध्ये सदैव विविध योजना, औषधोपचार, वैरण विकास, तांत्रिक मार्गदर्शन या साठी सहाय्य करणारा जिल्हा परिषद सातारा येथील पशुसंवर्धन विभाग ! पशुसंवर्धन विभागातर्फे कार्यरत १७१ दवाखान्यांच्या माध्यमातून पशुवैद्यकीय अधिकारी अर्थात पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक अविरत सेवा देत असतात. त्यामुळे या जिल्ह्यात गोपालन , म्हैसपालन, कुक्कुटपालन, वराह पालन, श्वानपालन, वैरण विकास, डेअरी, मुरघास निर्मिती असे अनेक पशुसंवर्धन संबंधित व्यवसाय जिल्ह्यामध्ये बहरले असून यामध्ये पशुसंवर्धन विभागाचे मोठे योगदान आहे.
सचिव (पदु) यांच्या नियंत्रणाखाली विभागप्रमुख या नात्याने आयुक्त पशुसंवर्धन यांच्या प्रशासकीय नियंत्रण व निर्देशनाने पुणे येथील मुख्यालयाकडून विभागाचे नियंत्रण व प्रशासन केले जाते. पशुरोग अन्वेषण विभाग, पुणे-४११ ०६७ , पशुजैव पदार्थ निर्मिती संस्था पुणे- ४११००७ व इतर प्रमुख संस्थांचेही नियंत्रण व प्रशासन आयुक्त कार्यालयाकडून केले जाते. त्याचप्रमाणे आयुक्त कार्यालयाकडे प्रादेशिक व जिल्हास्तरीय कार्यालयांचे नियंत्रण व प्रशासन आहे. पशुसंवर्धनाची प्रमुख उद्दिष्टे व योजना पार पाडण्यासाठी राज्याचे एकूण सात विभाग असून या विभागांचे प्रमुख म्हणून प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त (७) हे नियंत्रण व प्रशासनाचे कार्य करतात. जिल्हास्तरावर जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी हे नियंत्रण व प्रशासनाचे कार्य करतात.
सातारा जिल्हात 11 पंचायत समिती मधून पशुधन विकास अधिकारी (विस्तार) हे तालुक्यातील पशुपालकांना पशुसंवर्धन विषयक मार्गदर्शन व योजनांची प्रचार व प्रसार करीत असतात. जिल्हा परिषदे अंतर्गत दवाखाने कार्यरत असुन त्या संस्थांच्या संस्थाप्रमुखांमार्फत आवश्यक पशुवैद्यकिय सेवा, रोगप्रतिबंधक लसीकरण इ.सेवा पुरविल्या जातात. पशुसंवर्धन विषयक शासनाच्या व जिल्हा परिषदेच्या विविध योजना राबविल्या जातात. जिल्ह्यातील पशुधन व उत्पादन वाढीसाठी विविध प्रशिक्षण शिबीरे आयोजित केली जातात. तसेच गाव पातळीवर कार्यमोहिम शिबीरे आयोजित करुन आवश्यक सेवा पुरविल्या जातात.
१.२ व्हिजन आणि मिशन –
पशुसंवर्धनाच्या सुधारित तंत्रज्ञानाद्वारे पशुधनास आरोग्यविषयक सेवा देणे व पशुसंवर्धन विभागाचे वैयक्तिक लाभाच्या योजनांची अंमलबजावणी करणे .पशुपालक ते पशुउद्योजक तयार करणे. जिल्हामध्ये आर्थिक व पोषणविषयक विकासाची शाश्वती देणे.
१.३ उद्दिष्टे आणि कार्ये –
जिल्ह्यातील पशुपालकांना पशुसंवर्धन विषयक सेवा पुरविणे हे पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद सातारा या विभागाचे प्रमुख कार्य आहे. विभागातंर्गत कार्यरत असलेल्या विविध संस्था चे माध्यमातून योजना आणि जिल्हा स्वनिधी मधून विविध विकासविषयक योजनांची अमलबजावणी करून हे कार्य पार पाडण्यात येते.
विभागाच्या प्रमुख कार्यांमध्ये खालील महत्त्वाच्या बाबींचा समावेश होतो:-
- पशुपैदास धोरणांची प्रभावी अंमलबजावणी – कृत्रिम रेतनाव्दारे पशुधनामध्ये अनुवंशिक सुधारणा घडवून उत्पादकता वाढविणे.
- पशुधनाचे रोगराईपासून संरक्षण करुन जास्त दुध उत्पादन, अंडी उत्पादन, मांस, लोकर ही पशुजन्य उत्पादने वाढविणे.
- ग्रामीण शेतकरी व गरजू लाभार्थ्यांना दुधाळ जनावरे, शेळी गट, कुक्कुट पक्षी वाटप करुन पुरक उत्पन्नाचे व स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देणे.
- पशुधनास लागणाऱ्या वैरण व पशुखाद्याची उपलब्धता वाढविणे.
- पशुधनास लागणाऱ्या लसींची उपलब्धता व लसीकरण करणे.
- प्रसिध्दी व प्रचार कार्यक्रमाअंतर्गत पशुपालकांपर्यंत पशुसंवर्धन विषयक योजनांची माहिती पुरविणे. तसेच जिल्हा प्रशिक्षण धोरणाची अंमलबजावणी करणे.
- पशुसंवर्धन विषयक सेवा व प्रशासकीय सेवा आधुनिक व गतीमान करणेसाठी आवश्यक मनुष्यबळ व पायाभुत सुविधा उपलब्ध करुन देणे.
- जिल्हयातील पशु वैद्यकीय दवाखान्याचे सहाय्याने जिल्हयात पशुसंवर्धन विषयक योजना राबविणे.
१.४ प्रशासकीय सेटअप –