बंद

    आरोग्य विभाग

    आरोग्य म्हणजे केवळ व्याधी किंवा विकलांगता याचा अभाव नव्हे, तर संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य म्हणजे आरोग्य अशी जागतिक आरोग्य संघटनेची आरोग्य विषयक संकल्पना आहे. “सर्वासाठी आरोग्य” हे उद्दिष्ट ठेवून ते साध्य करण्याची बांधीलकी राज्य शसनाने स्विकारली असून त्यासाठी गेल्या काही वर्षापासून प्रतिबंधक, प्रवर्तक, उपचारात्मक आणि पुनर्वसनात्मक आरोग्य सेवा जनतेला पुरविणेकरीता आरोग्य विषयक सुविधांचे जाळे उभारणेसाठी राज्य शासनाकडून प्रयत्न करणेत येत आहे. राज्याच्या कानाकोप-यामध्ये ग्रामीण जनतेला आरोग्य विषयक सुविधा पोहचविणेसाठी ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे यांची स्थापना करणेत आली आहे. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गंत विविध कार्यक्रम, क्षयरोग नियंत्रण, कुष्ठरोग निर्मुलन, इ. कार्यक्रमांवर भर दिला जात आहे. पावसाळयामध्ये गॅस्ट्रो, हिवताप व पाण्यामुळे होणा-या इतर रोगांचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून विविध उपाययोजना राबविणेत येत आहेत. सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये खालील आरोग्य कार्यक्रमांतर्गंत सेवा पुरविण्यात येतात.

    • वाढत्या लोकसंख्येस आळा घालणेसाठी राष्ट्रीय कुटुंब कल्याण तथा लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रम.
    • मातृत्वाच्या वाटेवर प्रकृतीशी झगडणा-या माता, त्यांची बालके जन्मत:च गंभीर असतात. त्यासाठी राष्ट्रीय प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम. त्याचप्रमाणे शालेय तसेच आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी कार्यक्रम.
    • डासांमुळे फैलावणा-या वाढत्या रोगांवर नियंत्रणसाठी राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम.
    • शारीरिक विकलांगता आणणा-या रोगापासून मुक्तीसाठी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम.
    • मनुष्य प्रकृतीचा क्षय करणा-या रोगांवर नियंत्रणसाठी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम.
    • मानवी जीवनातील अंध:कार दूर करणेसाठी राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम.
    • दूषित पाण्यामुळे तसेच इतर प्रकारे उद्भवणा-या साथीच्या रोगांवर प्रतिबंध व उपाययोजना राबविणेसाठी एकात्मिक रोग सर्व्हेक्षण कार्यक्रम.
    • दूषित रक्ताव्दारे पसरवणा-या लैंगिक व एडस् सारख्या रोगांचा मुकाबला करणेसाठी राष्ट्रीय एडस् नियंत्रण कार्यक्रम.
    • याशिवाय इतर कार्यक्रमांतर्गंत आयोडीनयुक्त मीठाच्या कमतरतमुळे उद्भवणा-या गलगंडासारख्या रोगांवर नियंत्रणासाठी राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रम. त्याचप्रमाणे एक सामाजिक व राष्ट्रीय गरज म्हणून जन्म मृत्यू व विवाह नोंदणी जे काम ग्रामपंचायत पातळीवर केले जाते परंतू त्याचे नियंत्रण मात्र सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत केले जाते.

      वरील सर्व कार्यक्रमासाठी आवश्यक ते वैद्यकीय/निमवैद्यकीय कर्मचा-यांचे प्रशिक्षण व त्याबरोबरच आरोग्य विषयक सामाजिक हिताच्या गोष्टींना व्यापक स्वरुपात सर्व माध्यमांव्दारे प्रसिध्दी देवून जनजागरणाचे महत्वाचे काम या विभागामार्फत केले जाते.